कुख्यात गुंडाने धावत्या मोपेडवरुन चाकूने वार करुन केली युवकाची हत्या

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : विरोधी टोळीला माहिती देऊन हत्येचा कट आखल्याच्या संशयातून कुख्यात गुंडाने धावत्या मोपेडवर चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या केली. ही थरारक घटना रविवारी रात्री संजय गांधीनगर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गुंड फरदीन ऊर्फ शेरखान (वय २२ रा. नवी वस्ती, टेका नाका) याला अटक केली. त्याचा साथीदार फरदीन खान हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. इमरोज ऊर्फ इम्मू राशीद कुरेशी (वय २० रा. अब्दुल हमीदनगर), असे मृतकाचे नाव आहे. इम्मू गॅरेजमध्ये काम करायचा.

इम्मू व शेरखान मित्र असून, इम्मू हा विरोधी गटाचा सूत्रधार कुख्यात माऊझर टोळीला आपल्याबाबत माहिती देत असून त्याआधारे माऊझर हा आपल्या हत्येचा कट आखत आहे, असा संशय शेरखान याला होता. त्यामुळे त्याने इम्मूच्या खुनाचा कट आखला. रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास इम्मू व त्याचा मित्र शादाब हे घरासमोर उभे होते. शेर खान व फरदीन हे दोघे मोपेड व मोटारसायकलने तेथे आले. कामानिमित्त बाहेर जायचे असल्याचे शेरखान याने इम्मूला सांगितले. इम्मूला मोपेड चालवायला दिली. शेरखान मागे बसला तर मोटारसायकलवर फरदीन व शादाब बसले. ते संजय गांधीनगर परिसरात आले. धावत्या मोपेडवरच शेरखान याने इम्मूच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. इम्मूचे मोपेडवरील नियंत्रण सुटले. तो खाली पडला. सावध असलेल्या शेरखानने मोपेडवरून उडी घेतली. त्यानंतर शेरखान व फरदीन या दोघांनी पुन्हा इम्मूवर चाकूने वार करायला सुरुवात केली.

इम्मूला रक्ताच्या थारोळ्यात बघताच शादाब तेथून पळाला. इम्मूची हत्या केल्यानंतर शेरखान व फरदीन तेथून पसार झाले. दरम्यान एका नागरिकाने यशोधरानगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. इम्मूला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. शोध घेऊन शेरखानला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here