पुण्यात कोरोनामुक्‍तीचा वेग वाढला

पुणे (ऋषिकुमार फुले) – गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे, तर नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आज कोरोनाचे 1,806 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 761 तर पिंपरी -चिंचवडमधील 721 रुग्णांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच पुणे शहरात 31 आणि पिंपरी-चिंचवडमधील 12 जणांसह एकूण 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
पुणे शहरात सोमवारी आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणीसाठी 5,133 संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर आतापर्यंत 3 लाख 24 हजार 731 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 761 नमुने आज पॉझिटिव्ह आढळले. तर आतापर्यंत 66,727 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात 1,499 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या 50,113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 15,043 सक्रिय रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 738 रुग्ण गंभीर असून 444 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, 2,417 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
उपचारादरम्यान सोमवारी पुणे शहरात 31 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 21 पुरुष तर 10 महिला आहेत. या मृतांचे वय 38 ते 85 च्या दरम्यान होते. हे रुग्ण हडपसर, बिबवेवाडी, शिवाजीनगर, चंदननगर, वैदुवाडी, फुरसुंगी, सिंहगड रोड, येरवडा, मुंढवा, वाघोली, विश्रांतवाडी, आंबेगाव, गुरुवार पेठ, केशवनगर, वारजे, कसबा पेठ, वडगाव शेरी, वडगाव बुद्रुक, कोंढवा, कात्रज, रविवार पेठ, हिंगणे खूर्द येथील रहिवासी होते. त्यापैकी 80 ते 90 टक्के रुग्णांना न्यूमोनिया झाला होता. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1,571 वर पोचली.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 721 नवे रूग्ण आढळले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30,264 झाली आहे. सध्या सक्रिय 5,146 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 2,030 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या 944 रूग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 21,208 झाली आहे. सोमवारी 152 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. पिंपरी, इंद्रायणीनगर, दिघी रस्ता-भोसरी, पिंपळे गुरव, संभाजीनगर, चिंचवड गाव, रूपीनगर-तळवडे, देहू गाव, निगडी, सांगवी, चिखली येथील 12 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 613 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here