फिनिक्स फौंडेशनच्यावतीने महापरिनिर्वाण दिनी नागरिकांचा देहदानाचा संकल्प
अहमदनगर (प्रतिनिधी) : पैसा, संपती ही नश्वर आहे, त्यामुळे मनुष्याने असे कार्य करुन जावे, की ज्याची किर्ती सर्वांपर्यंत पोहोचेल. नेत्रदान – देहदान केल्याने आपल्या नंतर गरजवंतांना त्याचा उपयोग होतो. आपण गेल्यावर आपली कायम स्वरुपी आठवण ही दुसर्यांनी ठेवावी, आपले नाव रहावे, असे प्रत्येकाला वाटत असते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सर्व आयुष्य समाजाच्या उन्नत्तीसाठी अर्पण केले. त्यांचे कार्य किर्तीरुपी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी दाखविलेल्या समाजोन्नत्तीच्या मार्गावर चालणे हेच अभिप्रेत राहील. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नेत्रदान-देहदान करुन आपल्या स्मृती कायम जीवंत राहतील, असे कार्य करावे, असे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन 67 नागरिकांनी देहदानाचा संकल्प करुन अर्ज भरुन दिले. याप्रसंगी अध्यक्ष जालिंदर बोरुडे, शाहीर वसंत डंबाळे, अविनाश देडगांवकर, रतन तुपविहिरे, शाम कांबळे, शाहीर अशोक नेटके, शाहीर दिलीप शिंदे, रविंद्र सातपुते, वासुदेव राक्षे, प्रभाकर उबाळे, नाथा भिंगारदिवे, काका शेळके आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य उभे केले असून, गरजूंना मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. मोफत नेत्रशिबीराच्या माध्यमातून लाखो लोकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे, आणि यापुढेही असेच सुरु राहील. त्याचप्रमाणे देहदानाबाबत जागृती करुन लोकांना त्यासाठी उस्फुर्त करण्यात येत आहे, त्यास नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहदानाचे संकल्प पत्र भरुन देणारे हे गरजवंतांसाठी बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत. अशा उपक्रमातून समाजातील दु:ख नाहिसे करण्याचा प्रयत्न यानिमित्त केला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शाहीर वसंत डंबाळे म्हणाले, आज आरोग्य सेवा महाग होत चालली आहे. अशा परिस्थितीत जालिंदर बोरुडे फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून गरजूं रुग्णांना मोफत सेवा देत आहे ती समाजासाठी आदर्शवत बाब आहे. अशा उपक्रमांचे इतरांनाही अनुकरण केले पाहिजे. देहादान चळवळ वाढविण्यासाठी ते करत असलेले कार्य गरजू रुग्णांना जीवनदान देणारे ठरेल, असे सांगितले. शेवटी रतन तुपविहिरे यांनी सर्वांचे आभार मानले.






