कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून काही अंतरावर गेल्यावर महिलेच्या अंगावरील दागिने लुटल्याची घटना कोल्हापुर जिल्ह्यात मलकापूर येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. आरोपींनी ‘आई, घरी सोडतो’ असे म्हणत महिलेची लुट केली होती. आरोपींनी निर्जनस्थळी गेल्यानंतर पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन दागिने लुटले होते.
याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनेच्या २२ दिवसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. सलमान मुबारक खान तांबोळी (वय-२९) आणि त्याची पत्नी आयेशा तांबोळी (वय-२४ रा. नाईकबोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांना अटक केली आहे.
आरोपी १६ नोव्हेंबर रोजी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मलकापूर येथील मंगल ज्ञानदेव कुंभार (वय-५२) यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झाले होते. गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.७) सापळा रचून दोघांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल कुंभार या १६ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील पेरीड नाका परिसरात रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या.
त्यावेळी आरोपी दाम्पत्य कार घेऊन त्यांच्याजवळ आले. आरोपींनी फिर्यादी यांना विश्वासात घेत ‘आई, तुम्हाला कुठे जायचं आहे. चला घरी सोडतो’ असं सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास बसल्याने त्या कारमध्ये बसल्या. काही अंतर पुढे गेल्यानंतर एका निर्जनस्थळी आरोपींनी मंगल कुंभार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला.
आरोपींनी फिर्यादी यांना ज्योतिबा मार्गावरील केर्ली फाटा येथे सोडून निघून गेले. या प्रकारानंतर घाबरलेल्या मंगल यांनी पोलिसांत जाऊन फिर्याद दिली. पोलीस मागील २२ दिवसांपासून आरोपींचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ३ लाख ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.







