शिवपुरी (मध्यप्रदेश) : येथील पोलीस अधिकाऱ्याच्याच लग्नात चोरट्यांनी डल्ला मारला असून, सोन्याचे दागिने आणि पैसे लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शिवपुरी या शहरात पोलीस अधिकारी नरेंद्र सिंह रावत यांच्या लग्नामध्ये चोरांनी नवरीचे दागिने चोरी केले आहेत. शिवपुरी शहरातील महल कॉलनीमध्ये नरेंद्र सिंह रावत राहतात. ६ डिसेंबर रोजी त्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. ज्यावेळी स्टेजवर लग्नाचे विधी सुरू होते, त्यावेळी चोर लग्नात घुसले आणि त्यांनी वधूपक्षाच्या खोल्यांमध्ये प्रवेश केला. लग्नाचे विधी सुरू झाल्यानंतर सर्व मंडळी कार्यक्रमात व्यस्त होती. वधूकडील बहुतांश मंडळी स्टेजवर किंवा स्टेजच्या आजूबाजूला होती. या संधीचा फायदा घेत काही चोर वधू पक्षाकडे असणाऱ्या खोल्यांमध्ये शिरले.
नातेवाईकांच्या बॅगा आणि कपाटांमध्ये असणारे दागिने आणि पैसे घेऊन चोर पसार झाले. घटना लक्षात आली, तेव्हा फारच उशीर झाला होता. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. घटनेच्या वेळी खोलीत शिरलेल्या चोरांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे वर आणि वधू या दोन्ही पक्षाकडील लोक एकमेकांवर संशय घेत असल्याचं चित्र आहे. पोलिसांच्या लग्नातच चोरी होत असेल, तर सामान्य माणसाने काय करावं, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.






