नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
यामध्ये एकूण २.९५ कोटी घरांच्या उद्दिष्टापैकी ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या उर्वरित १५५.७५ लाख घरांच्या बांधकामासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे. २.९५ कोटी घरांच्या एकत्रित उद्दिष्टातील उर्वरित घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विद्यमान नियमांनुसार मार्च २०२१ च्या पुढे मार्च २०२४ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण चालू ठेवली जाणार आहे.
मार्च २०२४ पर्यंत योजना सुरू ठेवल्यामुळे ग्रामीण भागात “सर्वांसाठी घरे” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २.९५ कोटी घरांच्या एकूण उद्दिष्टापैकी मूलभूत सुविधांसह उर्वरित १५५.७५ लाख पक्की घरे बांधण्यासाठी मदत दिली जाईल. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत, एकूण २.९५ कोटी उद्दिष्टांपैकी १.६५ कोटी घरे बांधण्यात आली आहेत. २.०२ कोटी घरे, जी एसईसीसी २०११ डेटाबेस आधारित स्थायी प्रतीक्षा यादीच्या जवळपास समान आहेत त्यांचे बांधकाम १५ ऑगस्ट २०२२ च्या मुदतीपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे, २.९५ कोटी घरांचे एकूण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मार्च २०२४ पर्यंत योजना सुरू ठेवण्याची गरज आहे.






