पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : अज्ञात व्यक्तीने एका चिनी कंपनीच्या नावाने मेलआयडी तयार करून त्याद्वारे भोसरी येथील एका व्यावसायिकाकडे पैसे पाठवण्याची मागणी केली. व्यावसायिकाने देखील नऊ लाख २३ हजार रुपये अज्ञात व्यक्तीला चीनमधील एका बँकेच्या खात्यावर पाठवून दिले. हा प्रकार ८ मार्च २०२१ रोजी साई कंट्रोल सिस्टीम, एमआयडीसी भोसरी येथे घडला असून याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोपान विठ्ठल वेळे (वय ५३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा बनावट मेल तयार करणा-या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चीनमधील नानजिंग जेईरूम कॉ. ली या कंपनीसोबत ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. या कंपनीच्या एका अनोळखी इसमाने हा बनावट मेल आयडी तयार केला. त्यावरून फिर्यादी यांना बीएनएल बँकेच्या एका अकाउंटमध्ये १२ हजार ६०० यूएस डॉलर (नऊ लाख २३ हजार ३२८ रुपये) पाठवा असे सांगितले. व्यावसायिक संबंध असल्याने फिर्यादी यांनी त्या खात्यावर पैसे पाठवले. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.






