नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे बेपत्ता झालेल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली होती. तपासादरम्यान या चिमुकल्याचा बादलीतील पाण्यात बुडवून खून केल्याचे निष्पन्न झाले. मयत चिमुकल्याच्या आईने अनैतिक संबंध तोडल्याने शेजारी राहणाऱ्या एका २४ वर्षीय व्यक्तीने महिलेला धडा शिकवण्यासाठी या मुलाचा खून केल्याची चर्चा परिसरात सुरु होती.
पाच वर्षाच्या बेपत्ता झालेल्या चिमुकल्याच्या खूनचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र सोमर सिंह (वय-२४) या याला बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी जागोजागी पोस्टर तसेच सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यात आले होते. याच दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. विवाहित महिलेने अनैतिक संबंध तोडल्याने आरोपीने तिला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.
आरोपी महेंद्र सोमर सिंह आणि चिमुकल्याची आई एकमेकांच्या शेजारीच राहत होते. दरम्यानच्या काळात आरोपीचे विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, अचानक महिलेने विवाहबाह्य संबंध सुरु ठेवण्यास नकार दिला.त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या मुलाला बादलीत बुडवून मारले तीन दिवसांपूर्वी बोईसर पोलीस ठाण्यात चिमुकला बेपता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह बुधवारी (दि.८) आढळून आला होता.






