चॉकलेटचे आमिष दाखवत १३ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : माढा शहरात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर चाॅकलेट देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची ही घटना माढ्यातील बस स्थानक परिसरात असलेल्या दुकानात सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली आहे. पीडित मुलीने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सोमवारी रात्री उशिरा बाललैगिंक अत्याचार – पोक्सो कलमाअंतर्गत संदीप मनोहर जगदाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी माढ्यातील एका माध्यमिक शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. माढा शहरानजीक असलेल्या गावातील ही मुलगी असुन सध्या एसटीचा संप सुरु असल्याने ती मुलगी पायी चालत शाळेला जात होती. दरम्यान शाळा सुटल्यानंतर घरी जायला एखादे वाहन अथवा एसटी आहे का पाहण्यासाठी ती बस स्थानकाकडे आली होती. वर्गातच कंपास विसरल्याने ती बस स्थानक परिसरात असलेल्या केदार स्वीट बेकरीत दप्तर ठेऊन शाळेत गेली होती. माघारी आली तेव्हा ठेवलेल्या ठिकाणी दुकानात दप्तर नव्हते. आत बेकरीत दप्तर पाहण्यास पीडित मुलगी गेली असता या मुलीस चाॅकलेटचा बहाणा करुन तिच्या सोबत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

 

घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे करीत आहेत. माढा पोलिसांत पालकांसोबत येऊन पीडित मुलीने घडलेल्या घटनेची सविस्तर हकिकत पोलीस अधिकाऱ्यांना सांगून फिर्याद दिली. आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता १६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here