पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १७) दुपारी कारवाई केली. या कारवाईमध्ये करसंकलन कार्यालयातील दोन लिपिकांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी २४ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर प्रदीप शांताराम कोठावदे (वय ३९, पद लिपिक, थेरगांव कर संकलन विभाग, ड क्षेत्रिय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), हैबती विठ्ठल मोरे (वय ५१, पद लिपिक, थेरगांव कर संकलन विभाग, ड क्षेत्रिय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) या लोकसेवकांना अटक केली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून त्यांच्या मार्फत फ्लॅट, शॉप, ऑफीस भाड्याने देणे तसेच भाडे करारनामा, खरेदीखत मिळकत हस्तांतरण इत्यादी कामे केली जातात. तक्रारदार हे संबंधीत लोकांच्या मिळकतचे हस्तांतरण व कर पावती मधील नावाची दुरुस्ती करण्यासाठी ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कर संकलन विभागातील आरोपी लोकसेवकांना भेटले असता त्यांनी लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.
या तक्रारीची एसीबीने गुरुवारी पडताळणी केली. त्यात आरोपी लोकसेवक यांनी मिळकतचे हस्तांतरण करणे व कर पावती मधील नावाची दुरुस्ती करणे यासाठी आरोपी लोकसेवक प्रदीप याने पाच हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली व आरोपी लोकसेवक हैबती याने तक्रारदार यांची कामे करून देण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी केली. शुक्रवारी दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.







