पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पुणे सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१६) सायंकाळी साडेपाच्या सुमारास येथील लोहगाव विमानतळ येथे करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीने बनावट आधारकार्ड तयार करुन विमानाचे तिकीट बुक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फातिमा उर्फ हनिफा निशा (वय-४० रा.चेन्नई) आणि रफिक (वय-६२ रा. चेन्नई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिमा शुल्क विभागाच्या अधीक्षक वृद्धा जयंत सिन्हा (वय-५३ रा. पिंपळे गुरव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आरोपींना सोने तस्करीच्या गुन्ह्यात सिमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी रफिक याची अंगझडती घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या बॅगेत त्याच्या नावाची दोन आधारकार्ड सापडले. आरोपीने बनावट आधार कार्ड तयार करुन विमानाचे तिकीट बुक केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले करीत आहेत.






