ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम

driving-licence

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : गाडी चालवणार्‍यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गाडी चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी आता आरटीओच्या फेर्‍या माराव्या लागणार नाही. केंद्र सरकारने गाडी चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठीचे नियम सुलभ केले आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नियमांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने हे नवीन नियम लागू केले आहेत. या नियमामुळे ज्यांचे ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स बाकी आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ज्यांनी आरटीओकडे अर्ज केला आहे अशा अर्जदारांनी कुठल्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये जावे आणि आपल्या नावाची नोंदणी करावी. अर्जदारांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे आणि तिथेच ड्रायव्हिंग चाचणी द्यावी लागणार आहे. ड्रायव्हिंग स्कूलकडून अर्जदारांना एक प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारावर अर्जदाराला गाडी चालवण्याचा परवाना मिळेल.

काय आहेत नवे नियम
अधिकृत एजन्सीकडे दुचाकी, तीनचाकी आणि हल्क्या वाहनांच्या प्रशिक्षणासाठी ड्रायव्हिंग स्कूलकडे एक एकर जमीन असणे बंधनकारक आहे. तसेच मध्यम आणि अवजड वाहनांचे प्रशिक्षण देण्यासाठी ड्रायव्हिग स्कूलकडे दोन एकर जमीन असणे बंधनकारक असणार आहे.

प्रशिक्षकाचे शिक्षण कमीत कमी १२ वी पास असणे बंधनकारक असून त्याला पाच वर्षाचा गाडी चालवण्याचा अनुभव आणि वाहतुकीच्या नियमांचे योग्य आकल असणे नियमांत बंधनकारक आहे.

मंत्रालयाने या शिक्षणासाठी एक अभ्यासक्रम निश्चित केला आहे. हलक्या वाहनाच्या प्रशिक्षणासाठी ४ आठवड्यांचा आणि २९ तासांचा अभ्यासक्रम ठरवण्यात आला आहे. थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन भागात हा अभ्यासक्रम विभाजित करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here