ॲड.रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला; पोलीस घटनास्थळी दाखल

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे.

रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना दुखापत झाली नसून कारवर रॉडने काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जळगाव पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली

बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. रोहिणी खडसे यांनी महिलांना कोणी त्रास देणार असेल तर चोप दिल्या शिवाय सोडणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण आणखीच तापले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले. आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवारात सध्या सुरू आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकारण वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here