सासऱ्यानेच काढला सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ; ब्लॅकमेल करणाऱ्या सासऱ्यास अटक

mobile-shooting-in-bathroom

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : मूल होत नसल्याचे कारण पुढे करून अनैतिक संबंध ठेवण्यासाठी, सुनेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढल्याप्रकरणी सासऱ्याला पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील सुनेला मूल होत नव्हते. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्वतःच्या सुनेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी सासऱ्याने तिला सोडून दिले. घडल्या प्रकाराविषयी पीडित महिलेने पतीस सांगितले होते, परंतु त्यावेळी पीडितेची समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले होते. पण २० डिसेंबर रोजी पुन्हा सकाळी आठच्या सुमारास पीडित महिला घरासमोरच्या बाथरूममध्ये अंघोळीस गेली असता आरोपी सासऱ्याने महिलेच्या न कळत मोबाइलमध्ये शूटिंग काढले. त्यानंतर आरोपीने सदरचे शूटिंग पीडित सुनेला दाखवून तुला माझ्या मुलापासून मुलबाळ होणार नाही. तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझे अंघोळ करतानाचे हे शूटिंग पुढे पाठवीन म्हणून ब्लॅकमेल केले.

यावेळी पीडित महिलेने फोन करण्याच्या कारणाने मोबाइल घेतला आणि आरोपी सासऱ्याची नजर चुकवून पीडितेने शूटिंग पाहून खात्री करून घेऊन तो आपल्या भावाच्या मोबाइलवर पाठवला. आरोपीने पीडित महिलेस हे शूटिंग वारंवार दाखवून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल,असे वर्तन केले. पीडित महिला माहेरी गेली आणि तिने तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगून आज पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्चे हे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here