लुधियाना बॉंबस्फोटातील मास्टरमाइंड दहशतवादी मुलतानीला जर्मनीतून अटक

नवी दिल्ली : लुधियाना बॉम्बस्फोटाप्रकरणी जर्मनीतील शीख फॉर जस्टिसचा दहशतवादी जसविंदर सिंग मुलतानी याला अटक करण्यात आली आहे. मुलतानीला मध्य जर्मनीतील एरफर्ट येथून फेडरल पोलिसांनी अटक केली. लुधियाना बॉम्बस्फोटाच्या प्राथमिक तपासात मुलतानीचे नाव पुढे आले आहे.

लुधियाना बॉम्बस्फोटाची योजना पाक गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर हरविंदर सिंग रिंदा यांच्यामार्फत आखली होती. मुलतानीची चौकशी करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा लवकरच जर्मनीला जाऊ शकतात. पंजाब पोलिसांचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग यांना लुधियाना बॉम्बस्फोटासाठी तयार करण्यात आले होते.

मुलतानी दिल्ली आणि मुंबईतही बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर केंद्र सरकारच्या आवाहनावरून त्यांना अटक करण्यात आली. खलिस्तान समर्थक असण्यासोबतच मुलतानीवर पंजाब सीमेवरून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची पाकिस्तानमार्गे भारतात तस्करी केल्याचाही आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here