विदर्भ का भाळला?

  shrad-joshi

  नाशिक (जेष्ठ प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव)
  शेतकरी संघटना विदर्भात येण्यापूर्वी इकडे शेतकरी संघटीत नव्हते, आंदोलने होतच नव्हती असे नव्हे. कापूस उत्पादक संघ नावाची एक संघटना छोटे मोठे आंदोलने करीत होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बहिरम येथे प्रचंड मोठे आंदोलन झाले होते. त्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. कापूस एकाधिकार योजनेमुळे तर शेतकरी खवळला होता. आपला आवाज दाबला जातोय ही भावना निर्माण होत होती.

  यापार्श्वभूमीवर १९८० साली जोशी विदर्भात आले. दर्यापूर येथे प्रा. शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ‘ सरकार शेतकऱ्यांचा शत्रू आहे. शेती मालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे. ’ अशी सरकार विरोधी भूमिका त्यांनी मांडली. सरकारवर चिडून असलेल्या शेतकऱ्यांना हे बोलणं आपलंस वाटलं. पडद्यावर व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या अमिताभमध्ये स्वतःला बघणाऱ्या प्रेक्षकांसारखाच शेतकरी जोशींमध्ये बघू लागला जोशींच्या विदर्भ भेटी वाढू लागल्या. ‘ गरीबीचं मूळ कारण कोरडवाहू शेती आहे.’ असा सिध्दांत त्यांनी मांडला. ती का तोट्याची आहे ? शेतीची बॅलेंशीट कशी असते ? अशी अनेक उदाहरणे ते देऊ लागले.


  देशी विदेशी शास्त्रज्ञांचे सिध्दांत ते सोप्या भाषेतून सांगू लागले. जोशी कोरडवाहू शेतीच्या समस्या मांडू लागल्यामुळे सर्वाधिक कोरडवाहू शेतकरी असलेला विदर्भ आणि मराठवाडा त्यांच्या मागे उभा झाला. आपल्या समस्या कुणी तरी मांडतय, जे आपल्याला सांगायचे आहे, बोलायचं आहे, ते कुणीतरी बोलतं हे त्यांना दिसू लागलं. राज्यात सत्तांतर झालं. अंतुले गेले, संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रातील बेस कमी होऊ लागला. त्यामुळे जोशींचं लक्ष विदर्भ मराठवाड्याकडे केंद्रीत होऊ लागलं. विजय जावंधीया, वामनराव चटप, सरोज काशीकर, चंद्रकांत वानखडे, राम नेवले, अरुण केदार अशी मोठी फौज तयार झाली. ती आंदोलने गाजवू लागली.
  (अंगारवाटा लेखक – भानुदास काळे)

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here