महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड

pravinkumer-Bhim-mahabharat

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बी.आर.चोप्रांच्या महाभारत या गाजलेल्या मालिकेतील भीमाची भूमिका साकारणाऱ्या प्रविणकुमार यांना कोण ओळखत नाही. पण आजची सकाळ उगवली ती त्यांच्या दुःखद निधनाची बातमी घेऊनच प्रवीण कुमार सोबती यांनी दिल्लीमधील अशोक विहार येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही वर्षांपासून प्रवीण कुमार सोबती आजारपणामुळे त्रस्त झाले होते. या आजारपणात गोळ्या औषधे घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. आजारपणामुळे काम करता येईना याचमुळे उत्पन्नाचे साधनच कुठले त्यांच्याकडे नव्हते. यासाठी त्यांनी सरकारकडे पेन्शन मिळावी म्हणून तगादा लावला होता मात्र त्यावर कुठलाच निर्णय घेतला गेला नव्हता .

प्रवीणकुमार यांचा जन्म सरहलीकला (पंजाब) येथे झाला होता. २.०५ मीटर उंची व १२३ किलो वजनाच्या भरभक्कम शरीरयष्टीमुळे त्यांना भिमाची भूमिका मिळाली होती. आजही भीम म्हटले म्हणजे प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर प्रवीणकुमार यांचीच मूर्ती उभी राहते. शिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ते उत्तम अॅथलिटदेखील आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ४ पदकांची कमाई केली आहे. तसंच ऑलिम्पिकमध्येदेखील त्यांनी भारताचं प्रतिनिधित्वदेखील केलं आहे. देशासाठी त्यांनी आशियाई खेळात १९६६ च्या बँकाक येथे थाळीफेकमध्ये सुवर्णपदक, याचवेळी हातोडाफेकीत कांस्यपदक, १९७० मध्ये थाळीफेकमध्ये सुवर्णपदक तर १९७४ ला तेहरान येथील थाळीफेकीत रौप्यपदक तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत १९६६ किंग्सटन येथे हातोडाफेकीत रौप्यपदक पटकावले आहे.

बी आर चोप्रा भीमच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत असल्याचे प्रवीण कुमार यांना समजले होते. तेव्हा ऑडिशन देण्यासाठी ते तिथे पोहोचताच भरभक्कम शरीरयष्टी पाहून त्यांचे सिलेक्शन करण्यात आले. भीमाची भूमिका गाजवल्यानंतर प्रवीण कुमार सोबती यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले होते. ​अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा शहेनशाह या चित्रपटातील मुख्तार सिंग ही त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. याशिवाय ‘करिश्मा कुदरत का’, ‘युद्ध’, ‘जबर्द’, ‘खुदगर्ज’, ‘लोहा’, ‘मोहब्बत के दुश्मन’, ‘इलाका’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट होते. त्यांनी हिंदी, तामिळ व तेलगू भाषेतील ३० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रविणकुमार यांचा पहिला चित्रपट होता रक्षा. जेम्सबॉण्डपटाप्रमाणे असलेल्या या चित्रपटाचे नायक होते जितेंद्र. महाभारताच्या भीमाच्या भूमिकेने नाव मिळवून दिले असले तरी चाचा चौधरी या मालिकेतील साबूची भूमिकाही त्यांनी केली होती.

त्यानंतर त्यांचे १९८१ – मेरी आवाज सूनो, १९८२ – गजब, हमसे ना जीता कोई, हम से है जमाना, १९८४ – लोरी, हम है लाजबाब, जागीर, १९८५ – करिश्मा कुदरत का, युध्द, जबरदस्त, आखिर क्यो?, महाशक्तिमान, १९८६ मध्ये चंबल का बादशाह, अधिकार, अविनाश, रात के बाद, १९८७ – नामोनिशान, खुदगर्ज, लोहा, हुकूमत, डाकबंगला, दिलजला, तेरा करम मेरा धरम, १९८८ – शहेनशाह, मोहब्बत के दुश्मन, कमांडो, मालामाल, अग्नि, बीस साल बाद, प्यार मोहब्बत, दुख दर्द, १९८८ ला त्यांना महाभारत मालिका मिळाली. १९८९ – संतोष, मिट्टी और सोना, इलाका, शहजादे, मेरी जबाब, एलान ए जंग, लहू की आवाज, १९९० – आतिशबाज, घायल, आज का अर्जुन, काली गंगा, शेर दिल, नाकाबंदी, आग और अंगारे, माइकल मदन कामा राजन (तामिळ), १९९१ – शंकरा, अजूबा, १९९२ – पनाह, हमला, वक्त का बादशा, १९९४ – बेटा हो तो ऐसा, किष्किंदा कांड (तेलगू), १९९६ – जान, अजय, १९९७ – सूर्यपूत्र शनिदेव, १९९८ शाम धनःशाम, ट्रेन टू पाकिस्तान, २०१३ – महाभारत और बरबरीक. भक्कम शरीरयष्टीमुळे बहुतेक चित्रपटांत त्यांना गुंडांच्या भूमिका मिळाल्या होत्या.२०१३ मध्ये प्रवीणकुमार यांनी आम आदमी पार्टीत सहभागी होत वजीरपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

वयाच्या ७५ व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती हे आर्थिक संकटाला तोंड देत होते. यातून मला सरकारने मदत मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती. प्रविणकुमार सोबती यांना एक मुलगी आहे तिचे लग्न झाले आहे. प्रविणकुमार सोबती त्यांच्या पत्नीसोबत राहत होते. मात्र मणक्याच्या त्रासामुळे आणि वयोपरत्वे त्यांना एकाच जागेवर बसून राहावे लागत होते. शिवाय शरीर साथ देत नसल्याने आणि पोटाच्या तक्रारी यामुळे देखील त्यांचे खूपच हाल होत होते. त्यांच्या पत्नी विना याच त्यांची सर्व काळजी घेत होत्या.

प्रविणकुमार सोबती यांनी बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडेंट म्हणून काम केले होते. त्यामुळे बीएसएफ कडून त्यांना पेन्शन मिळत होती मात्र ही मदत खूपच तुटपुंजी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. माझा आर्थिक खर्च यापेक्षा जास्त असल्याने सरकारने माझी पेन्शन सुरू करावी अशी मागणी त्यांनी एक महिन्यापूर्वी केली होती. प्रविणकुमार सोबती यांनी साकारलेला भीम प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here