उल्हासनगरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

attack

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथे एका व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प १ भागात राहणाऱ्या रवी पेसवानी यांचं गोलमैदान परिसरात फास्ट फूड सेंटर आहे. याच परिसरात आरोपी पवन गुप्ता याचंही स्नॅक्स आणि ज्यूस सेंटर आहे. मात्र रवीच्या दुकानामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची आरोपी पवन गुप्ताची धारणा होती. यातूनच त्यानं २५ जानेवारीच्या पहाटे रवी पेसवानी याला जीवे मारण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र रवी तिथून निसटून पळून गेला. यानंतर १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रवी हा गोलमैदान परिसरातून दुचाकीवर त्याच्या मित्रासह जात असताना पवन गुप्ता यानं आणखी ४ साथीदारांसह त्याला रस्त्यात थांबवत त्याच्यावर तलवार, चॉपर, हातोडा, स्टीलचा पाईप यानं हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सुदैवानं रवी पेसवानी आणि त्याचा मित्र हे त्यांची गाडी तिथेच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी रवी याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पवन गुप्ता आणि त्याच्या साथीदारांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नसून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here