पुण्यात वर्गात घुसून १० वीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार

पुणे (क्राइम रिपोर्टर शंकर शंकपाळ) : राज्यात लवकरच दहावीच्या परिक्षा सुरु होणार आहेत. शैक्षणिक वर्ष संपल्याने प्रत्येक विद्यालयात दहावीच्या मुलांना निरोप देण्यात येत आहेत. मात्र, पुण्यातील एका शाळेमध्ये निरोपसमारंभ सुरु असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे.

निरोप समारंभादरम्यान एका तरुणाने वर्गात घुसून विद्यार्थिनीवर चाकूने वार केले. या घटनेमुळे परिसरात आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत घडला आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून त्यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ सुरु होता. आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर चाकूने वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीवर वार केल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपी तरुणाचा शोध सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here