दिल्लीत हायअलर्ट : दहशतवादी हल्ल्याचा इशारा

दिल्ली पोलीस

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून शहरात हल्ला करून मोठी मनुष्यहानी घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. गुप्तचर यंत्रणेने संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्याची गंभीर दखल घेत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राजधानीत ‘हाय ऍलर्ट’ जारी करण्यात आला असून वर्दळीच्या मार्केटमध्ये पोलीस सुरक्षा वाढवली आहे.

गुप्तचर यंत्रणेने संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत सावध केल्यानंतर दिल्ली पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. मंगळवारी राजधानीतील वर्दळीच्या सरोजनी नगर मार्केटमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ‘सर्च ऑपरेशन’ राबवले. यादरम्यान बाजारपेठेतील व्यापाऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच इतर मार्केटमध्येही ‘सर्च ऑपरेशन’ सुरू करण्यात आले आहे.

तेहरिक-ए-तालिबान (इंडिया सेल) या दहशतवादी संघटनेचा निनावी ई-मेल काही लोकांना आला आहे. या ई-मेलबाबत संबंधित लोकांनी उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती दिली. उत्तर प्रदेश पोलिसांनी ते ई-मेल दिल्ली पोलिसांना पाठवले आहेत. त्या अनुषंगाने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील अधिकाऱयांनी बुधवारी ही माहिती दिली. दहशतवादी कटाबाबत निनावी ई-मेलमध्ये केलेल्या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. तसेच निनावी ई-मेल पाठवणाऱया व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here