कोलकाता : बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदार हिचा तिच्या राहत्या घरी मृतदेह सापडला आहे. यामुळे बंगाली चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. नावारुपाला येत असलेली मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून आपले पाय जमवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिदीशाने आत्महत्या का केली असावी हा अनेकांना प्रश्न पडला आहे.
बिदीशा ही नगर बाजार परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होती, तिथेच तिने आत्महत्या केली. तिच्या फ्लॅटचा दरवाजा कोणी उघडत नसल्याने बुधवारी संध्याकाळी शेजारच्यांनी पोलिसांना बोलावून घेतले होते. दार आतून बंद असल्याने पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला होता.
पोलिसांना घरात जाताच तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार बिदीशाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे.







