सांगली (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून तो रिक्षात भरणाऱ्या कारखान्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. कोल्हापूर रोडवरील श्यामरावनगर येथील खिलारे मंगल कार्यालयाशेजारी असणाऱ्या गाळ्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ गॅस सिलिंडर, रोख रक्कम, गॅस भरण्याच्या चार मोटारी, वजनकाटे आणि पाच रिक्षा असा एकूण ४ लाख ४० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिद्धिविनायक सदाशिव देशिंगे (वय ३२, रा. नदीवेस, मिरज), सूरज बाळू काटकर (वय २२), कौशल संजय जाधव (वय २०), वजीर नियामत जमादार (वय ४९), राकेश विनायक कांबळे (वय २१, सर्व रा. श्यामरावनगर), संजय उर्फ सचिन रमेश पवार (वय ३८, रा. संजयनगर), नागेश तुकाराम ऐवळे (वय ३२, रा. पत्रकारनगर) आणि अमित आप्पासाहेब तांदळे (वय ३०, रा. गजानन कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना खिलारे मंगल कार्यालयाच्या बाजूस असलेल्या गाळ्यामध्ये सिध्दिविनायक देशिंगे हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्यातील गॅस हा मोटरमधून रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षात बेकायदेशीर भरून देत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने समर्थ कॉलनी येथील नरगुंदे यांच्या गाळ्यामध्ये छापा टाकला.
यावेळी गाळ्याचा मालक सिध्दिविनायक देशिंगे व त्याचे कामगार सूरज काटकर, कौशल जाधव हे त्याठिकाणी होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गॅसमधून आम्ही मोटरीने रिक्षामध्ये गॅस भरून देत असल्याची कबुली दिली. त्यानंतर चार भरलेले व १५ रिकामे असे १९ गॅस सिलिंडर, रोख रक्कम, ४ इलेक्ट्रिक मोटारी, ४ इलेक्ट्रिक वजन काटे व ५ रिक्षा असा एकूण ४ लाख ४० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






