अहिल्याबाई होळकरांचे कर्तुत्व,मातृत्व,दातृत्व आभाळाएवढे..!

    ahilyadevi-holkar

    शब्दांकन – सतिष उखर्डे-टेंभूर्णीकर
    या महाराष्ट्राला कर्तुत्ववान महिलांचा दैदीप्यमान असा इतिहास लाभलेला आहे,त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले,माता रमाई आणि ३१ मे रोजी ज्यांची जयंती उत्तम राज्यकर्ती, दानशूर,कर्तृत्ववान,कार्यक्षम, धाडसी,मुत्सद्दी आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या लोकमाता, राजमाता,राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर….! अहिल्याबाईंचा सुधारणावादी,कुशल इतिहास सांगत असताना ‘कल्पनांच्या’ अवास्तव भरार्‍या घेण्याची गरजच काय?

    तो काळ पेशवाईचा होता!धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यामध्ये ‘अधर्म’ थैमान घालत होता.तशातच अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१मे १७२५ रोजी जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या काठी वसलेल्या ‘चौंडी’ या छोट्याशा खेडेगावात वडील माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.जणूकाही तहानलेल्या जिवांना प्रेमाची पखरन घालणाऱ्या प्रेमळ आईचा जन्म…लोक मातेचा उदय…मूर्तिमंत त्यागाचा जन्म..!

    अहिल्याबाई होळकर यांच्या कृतीशील कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास, त्यांनी तहानलेल्या जिवांना थंडगार पाण्याच्या पाणपोई सुरू केल्या,भुकेलेल्यांसाठी अन्नछत्र उभारले,लोकांना निवाऱ्यासाठी धर्मशाळा बांधल्या,मंदिरे उभारली, मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि समाजाचाही…! तीर्थक्षेत्रांचा विकास केला, नदीला घाट बांधले व वस्त्रोद्योगाला उत्तेजन दिले. कोष्टयांची वसाहत स्थापन केली.चोर,डाकू,दरोडेखोरांचा बंदोबस्त केला.शेतीला पाण्याची गरज ओळखून ठिकठिकाणी विहिरी, तलाव,कालवे बांधले.आपल्या राज्यामध्ये गोरगरिबांना अन्नदान,कपडे,घोंगड्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यानी वाटल्या.

    अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह खूप मोठा होता. लढाईतही त्या खुप तरबेज होत्या.त्यांच्या राज्यांमध्ये सुबत्ता,संपन्नता आणि शांती सर्वत्र नांदत होती.राज्यांमध्ये लोकांच्या वतन-हक्काचे संरक्षण केले. पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या,पेशव्यांशी त्यांना लढा द्यावा लागला.आपल्या स्वतःच्या मुलीच्या विवाहसाठी असा स्वयंवर घोषित केला की, जो कोणी चोर,लुटारू,दरोडेखोरांचा आपल्या राज्यात बंदोबस्त करील त्या व्यक्तीशी मी माझ्या मुलीचा मुक्ताबाईचा विवाह लावून देईल. त्यावेळी जात-पात त्यांनी बघितली नाही, हा अलौकिक विचार नुसता जाहीर केला नाही तर, त्यांनी तशी कृती सुद्धा करून दाखवली आणि भिल्ल कुटुंबातील यशवंतराव फणसे या शूरवीर तरुणाशी त्यांनी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला म्हणजे त्यांचे राज्य जात,पात,पंथ, धर्मनिरपेक्ष होते.अहिल्याबाई सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या,कर पद्धती सौम्य केली. मात्र तिजोरीत भर घालत असताना त्यांनी प्रजाहिताकड़े जाणीवपूर्वक लक्ष दिले. अहिल्याबाई होळकर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजरामर झाल्या,याला त्यांची उदार अंत:करणाचीवृत्ती कारणीभूत ठरली. आपले पती खंडेराव होळकर कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळी त्या प्रथा-परंपरे प्रमाणे त्या ‘सती’ गेल्या नाहीत.म्हणजे समाजसुधारणेचा मोठा ‘आदर्श’त्यांनी याठिकाणी घालून दिला आणि राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.मल्हारराव होळकर ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत होत्या. त्यांनी आपल्या राज्यांमध्ये महिला सैनिकांची फौज निर्माण केली होती,त्यांना घोडेस्वारी,तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे,भालाफेक, गोळाफेक अशा अनेक प्रकारांमध्ये तरबेज केले. आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धेला,कर्मकांडाला स्थान दिले नाही.

    थोडक्यात त्याचं वर्णन करायचं झालं तर…त्या सत्ताधारी होती पण, सिंहासनावर नव्हत्या. त्या राजकारणी होत्या पण, सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. त्या पेशव्यांशी एकनिष्ठ होत्या पण,त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हत्या.त्या व्रतस्थ होत्या पण, संन्यासिनी नव्हत्या.त्यांच्या कल्याणी प्रतिभेचे किरण,नदीवरच्या घाटांमधुन उमटले.त्यांच्या जीवनदायिनी प्रेरणेनेतळी,अन्नछत्रे,धर्मशाळांचे रुप घेतले.१८ व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर त्या शुक्राच्या चांदणीसारख्या लुकलुकत होत्या.अशा मन,मनगट आणि तल्लख बुद्धीच्या जोरावर राज्य करणाऱ्या शुर रणरागिनी,संस्कृतीच्या रखवालदार त्या अहिल्याबाई होळकरच होत्या!अशा लाखोंच्या पोशिंद्या लोकमाता,राष्ट्रमाता,ज्यांनी शेवटपर्यंत लोकांच्या हितातच आपले हित शोधले,अशा अहिल्याबाई होळकर १३ ऑगष्ट १७९५ रोजी संथ पाऊले टाकीत मृत्यू सोबत अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या.आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारकार्याला मी कोटी-कोटी प्रणाम करतो!विनम्र अभिवादन करतो!….

    satish-ukharde

    शब्दांकन – शिवश्री.सतिष उखर्डे- टेंभूर्णीकर
    (प्रसिद्ध व्याख्याते तथा इतिहास अभ्यासक)
    मोब.नं-९४२२९९२३१०

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here