जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील आदर्शनगरात १३ मे रोजी पहाटे एका माथेफिरूने विविध अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवल्याची घटना घडली होती. त्यात १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंधरा दिवस सतत तपास केल्यानंतर पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली. दारू, गांजा, सोल्युशनच्या नशेत आपण हे कृत्य केल्याची कबूली त्याने दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आकाश गणेश महाजन (वय २१, रा. तांबापुरा) याला अटक केली असून, तो काहीच कामधंदा करीत नाही. सायकलसह इतर किरकोळ वस्तू चोरी करून मिळेल त्या किमतीत तो त्या विक्री करतो. यातूनच दारू, गांजा, सोल्युशनची नशा करतो. नशेत असताना १३ मे रोजी त्याने पहाटे आदर्श नगरातील जय गुरुदेव अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकी पेटवली. यानंतर पाठोपाठ जगदीश मलनाथाणी, पवन हेमनानी, डॉ. मिलींद जोशी, ओम पारपाणी, राजेश पंजाबी या सर्व लोकांची मिळून सात वाहने पेटवली. दरम्यान, एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आकाश चित्रीत झाला होता.
त्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शरीरयष्टी, वयाचा अंदाज घेऊन पोलिसांनी १५ दिवसात सुमारे ३० जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात आकाशची चौकशी करीत असताना तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. शिवाय पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी एप्रिल महिन्यात रात्र गस्त करीत असताना मध्यरात्री आकाशला हटकले होते. या वेळी तो सायकल चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होता. या मुद्यावर चौकशीअंती त्याने वाहने जाळल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक शिंदे यांच्यासह विजय खैरे, रेवानंद साळुखे, संजय सपकाळे, रवींद्र चौधरी, जितेंद्र तावडे, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे, अजय सपकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.







