नंदुरबार (तालुका प्रतिनिधी विजय निकम) : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तरुणाला महागात पडले असून त्याला प्रकाशा ता.शहादा येथून तलवारीसह ताब्यात घेण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूकीच्या अनुषंगाने तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी दि. २ ते १६ जून या कालावधीसाठी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात मनाई आदेश तसेच हत्यार बंदी आदेश लागू केले आहेत.
दि.६ जून २०२२ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना प्रकाशा ता. शहादा गावातील अजय गावित याने दि. ५ जून २०२२ रोजी प्रकाशा गावातील गौरव हॉटेल जवळ धारदार तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला अशी माहिती मिळाली. तसेच अजय गावीत याचे तलवारीने केक कापल्याबाबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्या फोटोमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे, ही बाब लक्षात घेता श्री.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना अजय गावीत यास ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
श्री.कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांचे एक पथक तयार करुन अजय गावीत याच्याबाबत सर्व माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याकामी रवाना केले. पथकाने संशयीत अजय गावीत याची माहिती घेतली असता तो प्रकाशा गावातील मुंजळा हट्टी येथील त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत अजय गावीत याच्या घराच्या चोहोबाजूंनी सापळा रचुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. अजय विजय गावित (वय-२४ रा. मुंजळा हट्टी, प्रकाशा) असे त्याने नाव सांगितले. त्यास वाढदिवसाबाबत विचारणा केली असता त्याने प्रकाशा गावातील गौरव हॉटेल जवळ तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे कबूल केले. तलवारही काढून दिली. सदर तलवार जप्त करण्यात आली आहे.






