माणगाव तालुक्यात आढळले ८ गावठी बॉम्ब

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेले गावठी बॉम्ब हे जिवंत असून सुरक्षेसाठी इंदापूर येथील एका कॉरीवर मॅगजिनमध्ये ठेवण्यात आले आहेत. सापळा रचत रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

माणगाव तालुक्यात पाणसई करंजवाडी येथे आदिवासी वाडीवर एका घरात जिवंत गावठी बॉम्ब असल्याची खबर रायगड बॉम्ब शोधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाणसई करंजवाडी आदिवासी वाडीवर माहिती घेऊन पथकाने सापळा रचला. पहाटे साडेचार ते पाच दरम्यान खबऱ्याने दिलेल्या माहिती ठिकाणी पथकाने छापा टाकला. यावेळी आरोपीच्या घराच्या परिसरात पथकाने शोध घेतला असता आंब्याच्या झाडाखाली खड्डा खणून एका प्लास्टिक बरणीत आठ जिवंत गावठी बॉम्ब ठेवलेले सापडले. याप्रकरणी पोलिसांनी माणगाव येथील बाबू जाधव व राम वाघमारे राहणार विळा आ.वाडी यांना अटक केली आहे.

बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने केलेल्या कारवाईबाबत माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अजून काही ठिकाणी गावठी बॉम्ब असल्याची माहिती पथकाकडे मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत ‘ब्रुनो’ या श्वानानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here