जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जगभरातील वाचकांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय पोचवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची’ वेबसाईट तयार केली आहे. आज १४ ऑगस्ट रोजी वेबसाईटचे लोकार्पण एका ऑनलाईन कार्यक्रमात अंनिसचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी माननीय सरोजताई पाटील आणि नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या उपस्थितीत केले.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यातर्फे सरोजताई पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “माननीय एन. डी. पाटील यांच्या वतीने या वेबसाईटचे उदघाटन झाले असं मी जाहीर करते. या वेबसाईटमुळे डॉ. दाभोलकरांचा विवेकवादी विचार समाजात सर्वदूर पसरण्यासाठी खूप मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी यांच्यापर्यंतही हा विचार पोचवण्यासाठी मदत होईल. समाजामध्ये अंनिस ही संस्था प्रबोधन करते. कोणतीही संस्था उभी करणं जितकं कठीण आहे, तितकंच त्याचं काम पुढे नेण्यासाठी जागृत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेबसाईटला समोर ठेवून कार्यकर्त्यांनी चांगले काम करावे,” अशी सदिच्छा त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीला अभिवादन करत व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अघोरी हत्येनंतर सर्व युवा-बुजुर्ग नेतृत्त्वाने व कार्यकर्त्यांनी ही चळवळ पुढे चालू ठेवली. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जात पंचायत विरोधात डॉ. दाभोलकरांनी मोठे काम उभे केले. पण आज धर्माच्या नावावर सत्ताधीशांकडून धर्मांधता, संप्रदायिकता आणि हिंसा पसरवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जाती आणि धर्मावरच्या अंधश्रद्धा आणि माणसाचं नातं तोडणाऱ्या सर्व कारवायांचा निषेध केला पाहिजे. त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यात विवेक आणि विवेकशीलता महत्त्वाची आहे म्हणूनच डॉ. दाभोलकरांनी विवेकवाहिनीची स्थापना केली. आज अंनिस विवेकशील विचारांचा प्रसार करण्यासाठी ऑनलाईन व्हावे लागत आहे, त्याचाच भाग म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ही वेबसाईट सर्व प्रकारच्या आंदोलनाला वेळोवेळी बळ देणाऱ्या एन. डी. सरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. त्यामुळे या वेबसाईटद्वारे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सगळीकडे पोचण्यासाठी आणि विवेकशील विचारांचा प्रसार महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात होण्यासाठी शक्य होईल” असा विश्वास यावेळी मेधाताई यांनी व्यक्त केला.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांनी सूत्रसंचालन केले तर व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी आभार प्रदर्शन केले. हंसराज महाले, सीमाताई पाटील, राज वैभव, हर्षल जाधव आणि अनिस कांबळे यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची वेबसाईट डॉ. दाभोलकारांचा विवेकवादी विचार समाजात सर्वदूर पोहोचवेल.- डॉ....







