सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे) : पिलीव-माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अशोक लक्ष्मण गोडसे या एका सामान्य शेतकऱ्याने काबाडकष्ट करून आपल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक ( पीएसआय ) बनविले असून गावापुढे एक आदर्श निर्माण केला आहे .
राणी अशोक गोडसे हिने आपल्या आई – वडीलांच्या कष्टाचे चीज करुन पिलीव गावच्या पहिल्या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून गावच्या इतिहासात आपले व आपल्या आई – वडिलांचे नाव कोरले आहे . गोडसे यांना नागपूर पोलीस स्टेशन येथे रुजू होण्याचे पत्र आल्याचे समजताच पिलीव गावचे विद्यमान सरपंच नितीन विठ्ठल मोहिते माळी यांच्या मार्गदर्शनाखाली माळी समाजाच्या वतीने राणी गोडसे यांची पिलीवच्या मुख्य पेठेतून सजविलेल्या रथातून हलगीच्या कडकडात व फटाक्यांची आतिषबाजी करत पारंपारिक पद्धतीचे वाद्य वाजवून गौरव मिरवणूक काढण्यात आली .
या मिरवणुकीच्या वेळी प्रत्येक चौकात गावातील महिलांनी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी , सभासदांनी गोडसे यांचा
सन्मान केला . राणी गोडसे यांनीही सजवलेल्या रथातून खाली उतरून राजमाता अहिल्यादेवी होळकर व धोंडो आबाजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतले . ग्रामपंचायत सभागृहात मा . जिप सदस्य गणेश पाटील , सरपंच नितीन मोहिते – माळी पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ देवकर व राणी गोडसे यांच्या मनोगताने सदर मिरवणूकीची सांगता करण्यात आली . आपला शैक्षणिक प्रवास अगदी खडतर झाला असून सदर यशाचे श्रेय हे माझ्या आई – वडिलांना जाते व माझ्या वडिलांनी मला अतिशय हलाखीची परिस्थिती असतानासुध्दा बाहेरगावी शिक्षणासाठी पाठविले त्याची मला पूर्णपणे जाणीव होती . मला माझ्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवायचे होते . ते मी आज पूर्ण केले असल्याचे गोडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी राणी गोडसे व त्यांचे वडील अशोक गोडसे हे भाऊक झाले होते . त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असल्याचे पहावयास मिळाले . यावेळी गौरव मिरवणूकीत माळी ब्रिगेडचे अध्यक्ष बाजीराव जाधव हणुमंत पिसे , दिपक जाधव , मोहन मोहीते यांसह पिलीवसह परिसरातील लोक सहभागी झाले होते.







