कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर जनार्दन सदाशिव चव्हाण) : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन या पत्रकार संघाचा २०२४ चा पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे फाटा येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी या ठिकाणी रविवार, दि. ७ जानेवारीला पार पडला. या सोहळ्यात मांडरे ( ता. करवीर ) येथील ‘बुलंद पोलिस टाइम्स’चे पत्रकार रामचंद्र सदाशिव रोटे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे, असोसिएशनचे जिल्हाअध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रामचंद्र रोटे यांनी अल्पावधीतच ग्रामीण भागातील अनेक सामाजिक विषयांना पोलिसांचा बुलंद आवाज ‘बुलंद पोलिस टाइम्स’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून पोलिस आणि जनेतील संवाद घडवून आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक दुर्लक्षित घटकांना समाजात स्थान व त्याच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचे कार्य केले. सामाजिकते बरोबरच त्यांनी क्रीडा, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी, क्राईम व नैसर्गिक आपत्ती या विषयक घटना यांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय दिला. या त्यांच्या सर्वांगीण कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्या बद्दल रोटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यापुढेही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील समस्या, प्रश्नांची सोडवणूक करणार असून, सदैव वस्तुनिष्ठ बातमीदारी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही रामचंद्र रोटे यांनी दिली . या वेळी राम पाटील, विश्वनाथ मोरे, डॉ. निवास वरपे, पंढरीनाथ पाटील, छाया रोटे, किशोर रोटे आदी मान्यवर उपस्थित होते.







