कथक नृत्यशैलीतून मांडणार श्रीरामाचा जीवनप्रवास : अवधेय

अवधेय

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला उद्या रविवारी (दि. २१) संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात गीतरामायणावर आधारित कथक नृत्य रचनेतून “अवधेय… एक आदर्श” या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून प्रभू श्रीरामांच्या चरणी संगीत नृत्याची कलासेवा अर्पण केली जाईल.

 

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीचे कलावंत करणार आहेत. आधुनिक वाल्मिकी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीत रामायणामधील निवडक आशयप्रधान १७ गाण्यांवर नृत्य दिग्दर्शन करून‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले जाईल.

 

प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी या नृत्यरचना दिग्दर्शित केल्या असून २२ कलावंतांच्या माध्यमातून त्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाच्या रंगमंचावर सादर केल्या जातील. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व प्रभाकर संगीत अकादमीतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here