धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : तालुक्यातील चावलखेडा येथे जाण्यासाठी वाघळूद खुर्द येथून रस्ता आहे. या रस्त्यावर अंजनी नदीवर पुल बांधलेला आहे. तसेच पिंप्री खुर्द येथून रेल्वेमार्गापाशी चावलखेडा जाण्यासाठी नदीवर पुल बांधलेला आहे.
मात्र दोन्ही पुलांची उंची कमी असल्याने पाऊल आल्यानंतर या पुलावरून पाणी वहात असते. त्यामुळे पिंप्रीकडून तसेच वाघळूद खर्दकडून येणाऱ्या लोकांना चावलखेडा येथे जाण्यास तसेच नीळकंठेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना त्रासदायक होत असते.
पिंप्री खुर्द येथे रेल्वेमार्गाजवळ असलेल्या रस्त्याने नीळकंठेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वापरावे लागते. मात्र हा रस्ता अतिशय छोटा असल्याने, पावसाळ्यात फारच त्रासदायक होत असते. तरी ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी या रस्त्याची डागडूजी करून तो मोठा करण्यासह दोन्ही पुलांची उंची वाढवली पाहिजे, अशी वाघळूद खुर्द व पिंप्री खुर्द गावातील ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची मागणी आहे.







