जळगाव (संपादक सुनिल पाटील) : वाढत्या शहराबरोबर शहरातील समस्या वाढल्या. रहदारी वाढली मात्र रस्त्यात खड्डे आणि लहान रस्ते यामुळे वाहतुकीची कोंडी तर जळगावकरांना नित्याचीच झाली आहे. या सर्व समस्यांमध्ये भरडले गेले ते रस्त्याच्या कडेला बसणारे लहान भाजीपाला व इतर साहित्य करणारे विक्रेते, फेरीवाले. सतत बदलत्या व अपुऱ्या जागा यामुळे व्यवसाय करावा तर कसा? हा प्रश्न त्यांच्यासमोर कायम आहे. या प्रश्नांसाठी त्यांनी वारंवार आंदोलने केली पण त्यांची दाद कोणी घेतली नाही. आता आपले प्रश्न जयश्री महाजन सोडवतील या विश्वासासह शहरातील लहान विक्रेते आणि रस्त्यावरील छोटे व्यावसायिक जयश्री महाजन यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आज (दि.११) सकाळी ८ ते १२ दरम्यान प्रभाग क्रमांक ९ मध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी काढलेल्या प्रचार फेरीचा व्हिडीओ बातमीसाठी. या प्रचार फेरीचा शुभारंभ हरीहरेश्वर मंदीर द्रौपदी नगर येथे झाला. त्यानंतर शर्मा सांडू कंपनी, प्रितम स्वेअर्स, देवकीनंद हॉल, दिलासा व्यसनमुक्ती केंद्र, बेंडाळे स्टॉप, कृष्णा टॉवर, केरळी मंदीर, स्वामी समर्थ मंदीर, तेली वाडा, शिवरत्न चौक, निवृत्तीनगर, एस.एम.आय.टी. रोड, गुजर गल्ली, बालविश्व स्कूल, श्री रेसिडेन्सी, साई होमिओपॅथी या मार्गे म्युनिसिपल इंजिनिअर भागवत पाटील यांच्या घरासमोर प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या असंख्य नेत्यांसह कार्यकर्ते, समर्थक, आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
प्रचार रॅलीच्या दरम्यान जयश्री महाजन यांनी रस्त्यावरील लहान विक्रेत्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विक्रेत्यांनी त्यांच्यासमोर भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या, जागेच्या अभावामुळे होणारा त्रास तसेच आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव यांचा या समस्यांमध्ये समावेश होता. जयश्री महाजन यांनी या समस्या ऐकून त्यांना त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजीपाला विक्रेत्या महिलांनी महाजन यांच्याशी गप्पा मारत आपल्या अडचणींविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर, जयश्री महाजन यांनी लहान दुकानदारांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेतल्या. यावेळी बोलतांना जयश्री महाजन यांनी विक्रेत्यांना आश्वस्त केले की, निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
जयश्री महाजन यांना शहरातील लहान विक्रेत्यांनी पाठिंबा दर्शविला असून, त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल या विश्वासाने ते जयश्री महाजन यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या प्रचार मोहिमेदरम्यान जयश्री महाजन यांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच लहान विक्रेत्यांनी जयश्रीताई यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.







