शहरातील भगिनी माझ्यासोबतच; सुभाष चौकातील जाहीर सभेत जयश्री महाजन यांनी व्यक्त केला विश्वास

जयश्री महाजन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज (दि. १५) रोजी सुभाष चौक येथे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना जयश्री महाजन यांनी कोणत्याही प्रलोभनाला न भुलता शहरातील भगिनी माझ्या बंधूंसह माझ्या पाठीशी उभे राहून, मला निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.

 

जाहीर सभेत सुरुवातीला मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शहरात सिव्हील हॉस्पिटलसमोर असलेल्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुध्द यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भाजपाचे मंत्री आणि चाळीसगावचे आमदार यांच्या उमेदवाराला ठरवून पाडा. त्यानंतर अयाजभाई नियाज, भारतीय कामगार संघटना व दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, आरपीआयचे जे.डी.भालेराव यांनी आपली मनोगते व्यक्त केली

 

आपले मनोगत व्यक्त करताना उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी सांगितले की, शहरात बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. विस्तारीत एम.आय.डी.सी. होणे तर सोडाच पण असलेले उद्योगही बंद होत आहेत. यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे. जळगावकरांना अवैध धंदे करणारा नव्हे तर जळगावात विद्यार्थी घडविणारा, शिक्षित करणारा, त्यांच्या भविष्यासाठी विचार करणारा आमदार हवा आहे. आपल्या ज्येष्ठांनाही डावलणारे तुमची काय स्थिती करतील याचा विचार करा. शहरातील सर्व भगिनी कोणत्याही प्रलोभनाला भुलून न जाता माझ्या बंधूंसह माझ्या पाठीशी उभे राहतील. जनतेने मतरुपी आशिर्वाद दिल्यास शहरातील संकल्पित प्रति दीक्षाभूमीचा प्रकल्प निश्चितच उभा राहील, शहरात औद्योगिक विकास करण्यासाठी विविध कंपन्यांना जळगावात आमंत्रित करून, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास माझे प्राधान्य असेल. यासोबतच पर्यटन, दळणवळण आदींचा विकास करुन जळगावचा पैसा जळगावात वाढून शहराचा आर्थिक विकास होण्यासाठी कायम प्रयत्नरत राहील.

 

सुभाष चौकात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची तब्बल आठ वर्षानंतर सभा होत असल्याने, या सभेकडे जळगावकरांचे लक्ष लागून होते. तसेच विविध पक्षातील एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनीही या सभेत नाथाभाऊ काय बोलणार या उत्सुकतेपोटी हजेरी लावली होती. मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने जयश्री महाजन यांच्या पाठीशी उभा असणारा जळगावकरांचा जनसागराचे चित्रच आजच्या सभेच्या रुपाने पहावयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here