आयआयएमएस मध्ये ‘पॉश’ कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा संपन्न

कार्यशाळा

यशस्वी एज्युकेशन सोसायटी व एव्हीके लॉ असोसिएट्स एलएलपीचा संयुक्त उपक्रम

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिंक छळ प्रतिबंध कायदा अर्थात पॉश कायद्याविषयीची सविस्तर माहिती सांगणारी जनजागृतीपर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. भूमिका पांढरे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि सर्वसमावशेषक वातावरण मिळावे यासाठी पॉश कायद्याची गरज अधोरेखित केली. यावेळी त्यांनी या कायद्यातील सर्व तरतुदी तपशीलवार सांगत लैंगिक छळावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायदेशीर चौकटीचीही माहिती सांगितली. या कायद्यानुसार तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया समाजावून सांगितली.ॲड. भूमिका पांढरे यांनी विविध उदाहरणांचे दाखले देत पॉश कायद्याविषयी अधिक विस्तृत माहिती सांगितली.

 

करिअरला सुरुवात करण्यापूर्वीच विद्यार्थी दशेत असताना या कायद्याची माहिती, महत्व व संवेदनशीलता समजल्यामुळे भविष्यातील नोकरदार व अधिकारी वर्ग हा महिला सुरक्षेला प्राधान्य देणारा असेल असे मत यावेळी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले.

 

प्रा.डॉ.पुष्पराज वाघ व प्रा.डॉ.मधुरा देशपांडे यांनी ॲड. भूमिका पांढरे यांचे स्वागत केले. संस्कृती कांबळे व कल्पेश महाजन या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर खुशी चोरडिया हिच्या आभार प्रदर्शनाने कार्यशाळेचा समारोप झाला. या कार्यशाळेत एमबीए आणि एमसीएचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here