घरफोड्या करणारा अट्टल चोरटा चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद

पुणे पोलीस

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शहरातील सोसायटीमध्ये घरफोड्या करणारा चोरटा सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याचे समजल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अनिल मिनसिंग खडका (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १७३ ग्रॅम वजनाचे एकूण ११ लाख ५९ हजार ५०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

 

गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अंमलदार तानाजी देशमुख व अमित कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हडपसर येथे झालेल्या घरफोडीमधील आरोपी हा चोरीचे दागिने विकण्याकरीता माळवाडी येथील अमरधाम स्मशानभूमीत येणार आहे. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक अमरधाम स्मशानभूमीजवळ पोहचले. तेथे संशयास्पद थांबलेल्या अनिल खडका याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे १७३ ग्रॅम वजनाचे ११ लाख ५९ हजार ५०० रुपयांचे दागिने मिळाले. त्याबाबत चौकशी केल्यावर त्याने हडपसरमधील मार्वे आर्को सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे सांगितले.

 

याबाबत अनुराधा फणी रायनपाटी (वय ४४, रा. मार्वेल आर्को सोसायटी, माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उघड्या दारातून प्रवेश करुन चोरट्याने घरातील कपाटातून २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. पुढील कारवाईसाठी अनिल खडका याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार अमित कांबळे, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शुभांगी म्हाळसेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here