जळगाव (प्रतिनिधी) : नवापूर चेक पोस्टवर बदली करण्याचा मोबदला म्हणून आपल्याच विभागाच्या निरीक्षकाकडून तीन लाखांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारल्यानंतर जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकार्यासह एका खासगी पंटरला छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील (वय ५६) तर भिकन मुकुंद भावे (वय ५२, रा.आदर्श नगर प्लॉट, नं.९८, जळगाव) या खासगी पंटरला अटक करण्यात आली आहे. ५५ वर्षीय तक्रारदार हेदेखील आरटीओ अधिकारी असून त्यांची नोव्हेंबर महिन्यात नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यात आल्यानंतर त्या मोबदल्यात जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भिकन भावे या खाजगी पंटरच्या माध्यमातून ४ नोव्हेंबर रोजी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.
मात्र लाच द्यावयाची नसल्याने अधिकार्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून भावे यांनी मेहरुण तलावाजवळील लेक अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी लाच रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.







