शहर हादरले : पुण्यात ४८ तासांत पाच खून

निर्घृण हत्या
File Photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शहरात गेल्या ४८ तासात खूनाच्या तब्बल पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वानवडी, सिंहगड रोड, वाघोली आणि मध्यरात्री कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. वानवडी तसेच सिंहगड परिसरात पुर्ववैमन्यासातून अल्पवयीन मुलांना ठार मारण्यात आलं आहे. तर, वाघोली परिसरात दारू पिताना वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या रागातून सोळा वर्षीय मुलाने एका ४६ वर्षीय व्यक्तीचा खून केला आहे. तसेच, कोंढव्यात तीन हजारांच्या व्यवहारातून एकाचा खून केला गेला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नर्हे परिसरात गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून माजी सरपंच व इतरांनी एका १८ वर्षीय तरुणाचा लाडकी बांबूने बेदम मारहाण करून खून केला. सुरूवातीला मारहाणीचा गुन्हा नोंद झाला. तरुण मृत पावल्यानंतर याप्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणावरून या परिसरात मोठी खळबळ माजली होती.

 

कोंढव्यात तीन हजारांच्या व्यवहारातून बुधवारी मध्यरात्री एकाचा खून केला आहे. ताहिर उर्फ बबलू शेगडीवाला (वय-५९) असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास चेत्री (वय ४७) याला ताब्यात घेतले आहे. ताहिर व विकास ओळखीतील आहेत. दोघेही मिळेल ती कामे करतात. दरम्यान, तीन हजार रुपयांवरून त्यांच्यात रात्री पुन्हा वाद झाला होता. वादानंतर रागाच्या भरात डोक्यात दगड घालून ताहिर याचा खून केला.

वाघोली परिसरात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दारूच्या नशेत असताना एकाने तुझा बाप टकल्या आहे, असे म्हटल्यानंतर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने मारहाण केली. त्यानंतर भला मोठा दगड उचलून आधी पाठित आणि नंतर छातीवर टाकून खून केला. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना वाघोलीतील दरेकर वस्ती येथे घडली आहे.

वानवडी परिसरात पुर्ववैमन्यस्यातून १७ वर्षीय मुलगा कॉलेजला जात असताना दोघांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करून भल्यासकाळी खून केल्याची घटना घडली होती. वानवडीतील खुनानंतर मंगळवारी मध्यरात्री सिंहगड रोड परिसरात तिघांनी गणेशोत्सवात झालेल्या वादातून एका १६ वर्षीय मुलाचा सपासप वार करून खून केला होता. गेल्या दोन दिवसात शहरात खुनाचे पाच घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here