पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : कल्याणीनगर भागात घडलेल्या पोर्शे अपघातानंतर शहर पोलिसांनी मद्यपी चालकांच्या कारवाईवर भर दिला असून, कारवाई तब्बल दहापटींनी वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात (२०२४) मध्ये ५३५० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असून, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई वाढली आहे.
कारवाई वाढीचे विशेष कारण म्हणजे, कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल अपघाताने राज्यभरात खळबळ उडाली होती. एका अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत आयटी इंजिनिअर तरुण-तरणीचा जीव घेतला होता. यानंतर शहरातील मद्यपिऊन वाहने चालविणाऱ्यावर कडक कारवाई सुरू केली गेली आहे. वाहतूक पोलीस आता अचानक नाकाबंदी मोहिम राबवत आहेत. त्या सातत्याने राबविला जात असून, रात्रीसोबतच दिवसा देखील त्या राबविल्याने कारवाईत चांगली वाढ झाल्याचे दिसत आहे. २०२३ मध्ये केवळ ५६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली होती. त्या तुलनेत २०२४ मध्ये ५३५० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू ठेवल्यास आणखी संख्या वाढू शकते. तर दुसरीकडे मद्यपिऊन वाहने चालविणाऱ्यांना जरब बसू शकते.
नववर्षाचे स्वागत तसेच सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी शहरात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, सातशे वाहतूक अंमलदारांचा बंदोबस्तावर होते. तर २७ महत्त्वाच्या ठिकाणी मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी नाकाबंदी केली होती. शहरात गेल्या वर्षभरात (२०२४) ५२६२ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये दर दिवशी सरासरी १४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. त्यातुलनेत ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ८५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.







