पुणे (जिल्हा क्राईम रिपोर्टर रोहन सोनाळे) | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा ठाम विश्वास शहरप्रमुख चेतन पवार यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी (दि. २ जुलै २०२६) सकाळी शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे पिंपरी-चिंचवड शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या चर्चांना आणि अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
‘मातोश्री’वरील या बैठकीत चेतन पवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांनी उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवत, पक्षाशी असलेली आपली निष्ठा कायम राखण्याची हमी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील एकही शिवसैनिक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नाही, हे आता या भेटीवरून स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना चेतन पवार म्हणाले, “आम्ही संघटनात्मक पातळीवर शाखा आणि बूथ स्तरावर जनसंपर्क अधिक वाढवणार आहोत. पक्षासोबत नव्या कार्यकर्त्यांना जोडण्यावर आमचा भर असेल. आगामी काळात शहर पातळीवर संघटना अधिक सक्षम करून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि अधिक जोमाने काम करू, असा निर्धार सर्व शिवसैनिकांनी केला आहे.”








