ऑनलाईन सेवार्थ प्रणालीत गडबड करत धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीड कोटींचा अपहार : चौघांना अटक

धुळे पोलीस

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) । दरमहा मिळणार्‍या वेतनात बेसिक एरियर्स देय नसताना ऑनलाईन सेवार्थ प्रणालीत रकमेची परस्पर वाढ करीत शासनाचे तब्बल एक कोटी ५५ लाख रुपयांचे नुकसान करीत अपहार करणार्‍या चार कर्मचार्‍यांविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपींना अटक केली आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ दरम्यान आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपीक मनोजगीर जगदीशगीर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपीक जगदीश देविदास सोनवणे, एएसआय नरेशगीर सुरेशगीर गोसावी व हवालदार मनोज अशोक खोंडे यांनी संगनमत करीत वेतनात कोणतेही बेसिक एरियर्स देय नसताना, ऑनलाईन ‘सेवार्थ’ प्रणालीत परस्पर वाढ करून तब्बल एक कोटी 55 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवले आणि शासनाचा विश्वासघात केला.

हा प्रकार समोर आल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात बुधवार, १ जुलै २०२६ रोजी गुन्हा क्रमांक 283/2026 दाखल करण्यात आला व चारही आरोपींना अटक करण्यात आली. तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव करीत आहेत.

या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. पोलीस तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here