इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, कळंब येथील विश्वासराव रणसिंग इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यालयात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले आणि रंगीबेरंगी फुगे देऊन त्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय केला.
दीर्घ सुट्टीनंतर नवीन गणवेश, आकर्षक दप्तरे आणि चेहऱ्यावर नवा उत्साह घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांमुळे शाळेचा परिसर गजबजून गेला होता. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अंगावरचा ताण कमी व्हावा आणि त्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध आनंददायी उपक्रमांचे आयोजन केले होते.
आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनी देखील मोठी गर्दी केली होती. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शाळेचे उत्तम नियोजन पाहून पालकांनी देखील समाधान व्यक्त केले, ज्यामुळे संपूर्ण शालेय परिसरात एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
या स्वागत समारंभाच्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम, प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, स्कूल टीचर मिस. अश्विनी घुगरी, मिस. सुजाता निंबाळकर, मिस. प्राजक्ता अर्जुन यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







