मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लष्कर दिनानिमित्त ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौका तसेच ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली असून त्यांच्याच भूमीतून नौदलाला सामर्थ्य देण्याचा प्रयत्न होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
मोदींनी त्यानंतर महायुतीच्या आमदारांशी संवाद साधत महायुती वाढवण्यावर भर देण्याचा कानमंत्र लोकप्रतिनिधींना दिला. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथे, माझगाव डॉकयार्ड येथे झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. “भारतात नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नवे सामर्थ्य, नवी दृष्टी दिली. आज त्यांच्याच भूमीत २१व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहोत. जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन या तिघांना एकत्र कमिशन केले जात आहे, हे पहिल्यांदाच होत आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कर ही तिन्ही फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म ‘मेड इन इंडिया’ आहेत,” असे सांगत पंतप्रधान मोदींनी भारतीय नौदलाला, निर्माणकार्याशी संबंधित सर्वांना, अभियंत्यांना, श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
“नौदल सुरक्षा, जहाज उद्योगात आपला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक प्रमुख ‘मेरीटाईम पॉवर’ बनत आहे. ‘निलगिरी’ ही चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्याला समर्पित आहे. ‘सुरत’ युद्धनौका ही त्यावेळची आठवण आहे, जेव्हा गुजरात बंदराच्या माध्यमातून पश्चिम आशियाशी भारत जोडला गेला होता. काही वर्षापूर्वी मला पहिल्या पाणबुडीत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. आता मला याच दर्जाच्या सहाव्या पाणबुडीचे उद्घाटन करण्याचे भाग्य मिळाले,” असेही त्यांनी सांगितले.







