पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : परकीय वैद्यकीय पदवी (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट) परीक्षेसाठी एका उमेदवाराच्या जागी बसलेल्या तोतया उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर रामटेकडी येथील आय ऑन डिजीटल झोन येथे रविवारी सकाळी नऊ ते दुपारी साडेचार यादरम्यान हा प्रकार घडला. परीक्षक विशाल लक्ष्मण भोसले यांनी वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकऱणी तक्रार दिली. त्यावरून, अनवर मकबुल आलम ॒पुरी (वय २६, मोहम्मदनगर, पादरी बाजार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
’फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट डिसेंबर २०२४’ ही परीक्षा रामटेकडी येथील आय ऑन डिजिटल झोन येथे रविवारी सकाळी नऊ ते साडेचार वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या वतीने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून या परीक्षा घेतल्या जातात.
परीक्षा सुरु असताना परीक्षक भोसले यांना सौरभ संजय श्रीवास्तव (भाटवालीया, देवरिया, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) या उमेदवाराच्या जागी अनवर मकबुल आलम हा पेपरला डमी उमेदवार म्हणून बसला असल्याचे आढळून आले. श्रीवास्तव याच्या जागी आलम याने डमी म्हणून परीक्षा देऊन टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पालवे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.







