पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : परवानगी नसताना ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्यामुळे पोलिसांनी बावधन परिसरातील म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये कारवाई केली. एका उद्योजकाची रात्रभर दारूची पार्टी रंगल्याची चर्चा होती. त्यानंतर, अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (वय २१, वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (वय ३७, भूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना खबर्याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांनी हॉटेलवर छापा घालून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांची गर्दी करून त्यांना जेवण्यास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे आढळले. हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होते. याबाबत, पोलिसांनी कारवाई करून हॉटेल कामगार सौम्यरंजन आणि व्यवस्थापक राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा नोंदवला.संबंधित हॉटेलमधील दारू विक्रीचा परवाना एका महिलेच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे.







