पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : असंख्य भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात ,दर्शन झालेनंतर हे भाविक मोठ्या प्रमाणात प्रसाद खरेदी करतात,या मध्ये पेढा,कलाकंद (कुंदा मिठाई ) मोठ्या प्रमाणात खरेदी करतात,अशावेळी भेसळयुक्त पदार्थांची विक्री ही मोठा प्रमाणात होते.
मागील वर्षीच्या चैत्र यात्रेवेळी भेसळयुक्त पदार्थांची बाब मा.सुनील नवाळे यांनी निदर्शनास आणून दिल्यावर ,अन्न भेसळ प्रशासन यांनी कारवाई करत सुमारे दोन टन भेसळयुक्त पेढ्यांची विल्हेवाट लावली,पण त्यानंतर अन्न व औषध भेसळ प्रशासन अधिकारी जोतिबा डोंगराकडे फिरकले नसल्यामुळे, परत जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातुनच कालबाह्य झालेल्या पेढे,कलाकंद यांची विक्री ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे , ही बाब वेळोवेळी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या कानावर घालून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, अश्यातच मंदिर परिसरातील एका दुकानात व्यापाऱ्यांकडून विक्रीसाठी आणलेल्या कलाकंद या मिठाई मध्ये ब्लेडचे पान सापडले, ही बाब माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील नवाळे यांच्या निदर्शनास आली.
त्यांनी बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून एखाद्या भाविकांच्या जिवाच्या बाबतीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पत्रकार परिषद घेऊन अश्या प्रकारच्या हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अन्न व औषध भेसळ प्रशासन अधिकाऱ्यावर व व्यापाऱ्यांवर कारवाई करून जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पेढे, कलाकंद याची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ,असे आवाहन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केले आहे. सदर कारवाई झाली नाही, तर उग्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा मा.सुनील नवाळे यांनी केला,यावेळी जोतिबा सोशल फौंडेशन चे पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.







