पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : खडकी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळ टायगर पॉइंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ असलेल्या शिवलिंग पॉइंट पासून काही अंतरावरील एका झाडाला गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना ११२ या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर कॉल आला होता. त्यानुसार शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता, आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक क्रेटा गाडी क्रमांक (एमएच १७ सीएम ९६९७) उभी होती. त्या गाडीची माहिती घेतली असता गाडी मालकाचे नाव अण्णा बादशहा गुंजाळ (रा. खंडगाव, संगमनेर, अहिल्यानगर) असल्याचे समजले.
त्या गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क केल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांचीच असून ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता, गुंजाळ हे तिथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत व ते तीन दिवसांपासून गैरहजर होते आणि त्यांचा फोन लागत नव्हता. त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार होती, असे पोलिसांना समजले. यातून मयताची ओळख पटली आहे.
माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.







