सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत सावदा पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो यांच्या आदेशानुसार सावदा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत पोलीस स्टेशन परिसरात श्रमदान करून स्वच्छता करत आहेत. या उपक्रमाद्वारे पोलीस दल सामाजिक बांधिलकीचे उदाहरण उभे करत असून, परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा संदेश देत आहेत.
या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन परिसरातील साफसफाई, कचर्याचे व्यवस्थापन, तसेच हरित परिसर निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. याच संदर्भात सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी सावदा शहरवासीयांना आवाहन केले आहे की, “आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही सामाजिक जबाबदारी आहे.” त्यांनी नागरिकांना आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे व स्वच्छ भारत मिशनला सक्रिय पाठबळ देण्याचे आवाहन केले.







