गुन्हेगारी प्रसाद भोजनातून नव्हे तर अवैध धंद्यामुळे वाढलीय – खा.भाऊसाहेब वाकचौरे; पोलिसांना कारवाईचे आदेश

खा.भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी गुन्हेगारी हि प्रसाद भोजनातून नव्हे तर अवैध धंदयामुळे वाढल्याची जाणीव करून देत गव्हाबरोबर किडे रगडले तर ठीक आहे पण किड्यांबरोबर गव्हू रगडले जाता कामा नये अशा सक्त सूचना केल्यात. पोलीस अधीक्षक यांच्याशी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क करत अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिलेत. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दुहेरी हत्याकांड होऊन आजपर्यंत चार दिवस उलटले असताना अधिकारी स्तरावर सर्वप्रथम कुठली अंमलबजावणी करण्यात आली त्याचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतील संजय शिंदे, सचिन कोते, मुकुंद सिनगर, सचिन चौगुले, नितीन शिंदे व अमोल गायके आदींनी सर्वं अधिकारी यांच्यावर रोष व्यक्त करत आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. यानंतर खा.वाकचौरे यांनी सर्वांना शांत करत या घटनेची सर्वात मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेची असून शिर्डीत सुरु असलेल्या चरस, गांज्या,ब्राऊन शुगर,व्हाईटनर, नशेच्या गोळ्या सर्रास विकत असल्याचा जाहीर खुलासा करत मेडिकल स्टोअर व पानटपरी सारख्या ठिकाणी मिळत असून सुद्धा अजून प्रभावी कार्यवाही नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. साईबाबा संस्थानने साईभक्त केंद्रस्थानी ठेवून शिर्डीत आलेल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला भोजन मिळाले पाहिजे याचा गांभीर्याने विचार करावा. शिर्डी जागतिक दर्जाचे देवस्थान असल्याने इथे घडलेल्या सर्वं घटनांचे पडसाद संपूर्ण जगभर पसरतात, त्यामुळे इथे येणारा भक्त सुरक्षित राहिला पाहिजे. त्याला सोयीसुविधा पुरविणे हे आपलं आद्यकर्तव्य आहे. संस्थानकडे अन्नदानासाठी ७०० कोटी रुपये जमा असून शिल्लक पैशाला इन्कम टॅक्सचा धोका असल्याची जाणीव करून दिली.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांना घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देत दुहेरी हत्याकांडातील दोन्हीही कर्मचारी निष्पाप असून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व्हावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीस कायमस्वरूपी नोकरीवर रुजू करून घेणेबाबत लक्ष घालण्याच्या सूचना केल्यात, तसेच अनेक कर्मचारी भयभीत झाले असल्या कारणाने त्यांना कामावर येण्याजाण्यासाठी संस्थानने गाड्या उपलब्ध करून देणेबाबत आग्रही मागणी केली. नगरपालिकेने अतिक्रमित जागांवर कारवाई करावी. कुणालाही पाठीशी घालू नये. पोलीस प्रशासनाने उत्पादन शुल्क आणि फूड व ड्रग्ज विभागाची मदत घेऊन कारवाई जलदगतीने करावी. शेवटी शिर्डीत शांती आणि समाधान नांदावे आणि शिर्डी भयमुक्त व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या वतीने उपस्थित सर्वं अधिकारी आणि पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले. यावेळी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी सर्वांना सोबत घेऊन तात्काळ खा.वाकचौरे दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांच्या घरी पोहचले आणि त्यांची सांत्वनपर भेट घेतली व धीर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here