मुंबई (हितेश मिस्त्री) – राज्यात मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला असताना पुण्यातील रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. परिणामी, रुग्णसंख्येत मुंबईला मागे टाकत पुण्याने अव्वल स्थान गाठले आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असताना मुंबईतील मृत्युदराचा वाटा 52 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. याउलट ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगावमध्ये मृत्युदरात प्रचंड वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचा आकडा 10 हजारांपर्यंत पोहोचण्यास 108 दिवसांचा कालावधी लागला. याउलट नंतरचे 10 हजार मृत्यू हे अवघ्या 37 दिवसांत झाले आहेत. अर्थात कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असताना एकाही महिन्यात मृत्युदर घटल्याचे दिसत नाही. कोरोनामुळे राज्यात रविवारी 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी सलग चार दिवस राज्यात मृत्यूंचा आकडा 300हून अधिक होता. दररोज 12 हजार नवे रुग्ण सापडणार्या राज्यात रविवारी मात्र 11 हजार 111 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा सहा लाखांनजीक पोहोचला आहे. सध्या राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 95 हजार 865 इतकी आहे.
पुणे जिल्ह्याने एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईलाही मागे टाकले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 606 इतकी असून मुंबईत एकूण 1 लाख 28 हजार 726 रुग्ण झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आजघडीला पुण्यात मुंबईहून दुप्पट अॅक्टिव्ह रुग्ण अर्थात कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या पुण्यात संक्रमित रुग्णांचा आकडा 41 हजार 080 इतका असून मुंबईत उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 17 हजार 581 इतकी आहे. ठाण्यातही मुंबईहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. ठाण्यात उपचार घेणार्या रुग्णांचा आकडा 20 हजार 288 इतका आहे. मुंबई, ठाणे व पुणेसारख्या महानगरांच्या तुलनेत छोट्या शहरांमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोरोना संक्रमणावर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या नाशिकमध्ये 9 हजार 373, कोल्हापूरमध्ये 7 हजार 109, नागपूरमध्ये 7 हजार 539, पालघरमध्ये 6 हजार 519, औरंगाबादमध्ये 5 हजार 822पर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान राज्यात सोमवारी 11 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, 8 हजार 493 नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या 1 लाख 55 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.






