एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा- मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार; शिवसेनेच्या आभार दौऱ्यासाठी नियोजन बैठक संपन्न

एकनाथ शिंदे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आभार दौऱ्याच्या नियोजनासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथजी शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्याच्या स्वागतासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी भव्य आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यात आणाखी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आणि संघटन अधिक व्यापक करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित कऱण्यात आले.

 

तालुका निहाय नियोजन व कार्यकर्ता संवाद
शिवसेनेच्या संघटन मजबुतीसाठी आणि आभार दौऱ्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तालुका निहाय बैठका घेण्याचा निर्णय झाला. जिल्हाप्रमुखांनी आपल्या-आपल्या तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना या दौऱ्यात सहभागी करून घ्यावे, अश्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी , आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल पाटील यांनी दिल्या.

 

“शिवसेना ही केवळ पक्ष नसून एक विचारधारा आहे. जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने कटीबद्ध राहिले पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा हा जळगाव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरेल.”
– मा. गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा

सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ
शिवसेना संघटन वाढवण्यासाठी जिल्हाभरात “प्रत्येक गाव तेथे शाखा, प्रत्येक घराघरात शिवसैनिक” या संकल्पनेवर आधारित सभासद नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत पुढील एका महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन सभासद नोंदणी करण्यात येईल. शिवसैनिकांनी घराघरात जाऊन पक्ष बळकटीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.अमोल पाटील यावेळी करण्यात आले.

 

शिवसेनेच्या पक्षसंघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीसाठी हा दौरा मोलाचा ठरणार असून येत्या काळात जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या एकजुटीचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

“प्रत्येक शिवसैनिक हा पक्षाचा कणा आहे. आगामी आभार दौऱ्यासाठी प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक शिवसेना कार्यकर्ता उत्स्फूर्तपणे सहभागी होईल याची दक्षता घ्यावी.”
– भाऊसाहेब चौधरी, शिवसेना सचिव

बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस चोपडा मतदारसंघाचे आ. प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे, पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल दादा पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, समाधान महाजन, माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, महिला आघाडी प्रमुख सरिताताई माळी कोल्हे, नंदाताई निकम, महानगरप्रमुख संतोष पाटील, गणेश सोनवणे, कुंदन काळे, महिला आघाडी महानगरप्रमुख शोभाताई चौधरी यांसह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 

बैठकीचे प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई माळी यांनी केले तर आभार महानगर प्रमुख गणेश सोनवणे व कुंदन काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here